पिंपरी : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. विशालनगर येथे सोमवारी (दि. २९) सकाळी सव्वासातच्या सुमारास सांगवीपोलिसांनी ही कारवाई केली.विक्या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय ४८, रा. शिवशक्ती तरुण मंडळ, रेल्वे लाईन जवळ, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कैलास पर्वतराव केंगले यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार हा विशालनगर येथील चोंधे लॉन्स, नदीच्या पुलाजवळ पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. त्यावेळी आरोपी कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्याने पिशवी लपवून त्यात काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याची पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. आरोपी विक्या याने तो गावठी कट्टा विक्रीसाठी आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ ऊंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी रोहीदास बोऱ्हाडे, कैलास केंगले, सोमनाथ असवले, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, दिपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विक्रीसाठी आणलेले पिस्तूल, काडतुसे जप्त : सांगवी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 4:50 PM