कोच्ची - केरळमधील कासरगोड परिसरातून ISशी (इस्लामिक स्टेट) संबंध असल्याच्या संशयावरून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ही कारवाई केली असून श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रमाणेच भारतातही हल्ले करण्याचा कट तो आखत होता, असा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. रियाज अबु बकर असं या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. कोच्ची येथील एनआयएच्या न्यायालयात त्याला आज हजर करण्यात येणार आहे.
२०१६ साली कासरगोड तेथून १५ तरुण अचानक बेपत्ता झाल्यानंतर खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासात हे सर्व तरुण आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्याअगोदर केरळमधील कासरगोड आणि पलक्कड येथून एनआयएने तीन संशयितांची चौकशी केली होती. दरम्यान, कासरगोड IS मॉड्यूल खटल्याअंतर्गत संशयितांच्या घरावर छापे देखील टाकण्यात आले होते. या छाप्यात धार्मिक उपदेशांशी संबंधित DVD आणि CD याशिवाय इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकच्या भाषणांच्या कॅसेट जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच मोबाईल, सिम कार्ड्स, मेमरी कार्ड्स, पेन ड्राईव्ह, अरबी आणि मल्याळी भाषेत असलेले नोट्सही हस्तगत करण्यात आल्या होत्या.
काय आहे कासरगोड प्रकरण
कासरगोड IS मॉड्यूल प्रकरण गेल्या वर्षी समोर आलं होतं. एनआयने हबीब रहमान नावाच्या एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्यावेळी हबीबबरोबरच केरळमधील १४ तरुणांनी IS मध्ये भरती होण्यासाठी जुलै २०१६ साली भारत आणि मध्य-पूर्व आशियाई देशातील आपल्या नोकऱ्याही सोडल्या होत्या.
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांशी संबंध तर नाही ना ?
भारतीय तपास यंत्रणा श्रीलंकेत ईस्टरच्या झालेल्या बॉम्बस्फोटांचा केरळमधील IS मोड्युलशी संबंध तर नाही ना ? याचा तपास करत आहेत. IS बाबत सहानुभूती असणाऱ्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले होते. श्रीलंकेतील स्फोटांबाबत त्यांच्याकडे देखील चौकशी करण्यात आली आहे.