नवी दिल्ली: गेल्या वर्षी नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या दंगलीदरम्यान दिल्ली पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुख पठाणने सोमवारी न्यायालयाकडे सुटकेची विनवणी केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या दिल्ली दंगलीदरम्यान, शाहरुखने पोलीस कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर पिस्तुल रोखल्याचे चित्र सोशल मीडिया आणि टीव्हीवर प्रचंड व्हायरल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शाहरुख पठाणला 3 मार्च 2020 रोजी अटक केली. सध्या तो तिहार जेलमध्ये आहे.
सुनावणीदरम्यान पठाणने कोर्टात त्या घटनेचा एक 26 सेकंदांचा व्हिडिओ दाखवला. तसेच, 'मी हवेत गोळीबार केला होता, कॉन्स्टेबल दहिया यांच्यावर पिस्तुल रोखली नव्हती. त्यामुळे माझ्यावर 'हत्येचा प्रयत्न' केल्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही. माझ्यावरील कलम 307 हटवून त्याऐवजी कलम 336 अंतर्गत आरोप निश्चित करावेत आणि माझी हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातून सुटका करावी', अशी मागणी केली आहे.
सुनावणीदरम्यान पठाणचे वकील खालिद अख्तर आणि मोहम्मद शादान म्हणाले की, दंगलीदरम्यान पठाण इतरांसोबत दगडफेक करताना दिसला नाही, किंवा कोणत्याही कारवाईची रणनीती आखण्याच्या प्रयत्नात नव्हता. पोलिसांना त्याच्याविरोधात तसा पुरावाही मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्यावर दंगलीचा कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.