नवी दिल्ली - कोरोनामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. कोणी वडील गमावेल तर कोणी आई... काहींनी आपला एकुलता एक मुलगा देखील गमावला आहे. असं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने कोरोनामध्ये आपली आई गमावली. त्यानंतर आता प्रॉपर्टीसाठी त्याचा मामा त्रास देत असल्याची माहिती त्याने दिली आहे. "प्लीझ मला वाचवा, पप्पा सोडून गेले अन् कोरोनामुळे आईचाही मृत्यू झाला. यानंतर मामा प्रॉपर्टीवर कब्जा करू पाहत आहे" असं म्हणत मुलाने आपली व्यथा मांडली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, "इलाहाबादमध्ये मामाने खूप त्रास दिला. या लोकांना प्रॉपर्टी हवी आहे" असं 9 वर्षीय ध्रुव श्रीवास्तवने म्हटलं आहे. ध्रुवचा जन्म झाल्यानंतर त्याचे वडील आईला सोडून निघून गेले. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर तो एकटाच राहिला. मामाला तो सापडू नये म्हणून प्रयागराज सोडून तो सध्या झारखंडमध्ये आपल्या मावशीच्या घरी राहत आहे.
ध्रुवच्या मावशीने सांगितलं की, 2008 मध्ये ध्रुवच्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं. त्यानंतर 2013 मध्ये ध्रुवचा जन्म झाल्यावर पती-पत्नीत वाद सुरू झाले. यानंतर त्यांनी तलाक दिला. ध्रुवची आई एका नर्सिंग होममध्ये एक नर्स होती. तिने ध्रुवला नीट सांभाळलं पण आता कोरोनामध्ये तिचा मृत्यू झाल्याने ध्रुव एकटा पडला आणि यानंतर प्रॉपर्टीसाठी मामा त्याला त्रास देऊ लागला आहे. त्यांना ही सर्व संपत्ती हवी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.