नालासोपारा : बिटकॉइनमध्ये हरलेल्या दहा लाख रुपयांबाबत बायकोला कसे सांगायचे? या विचारात विरारमधील एका व्यापाऱ्याने चक्क चोरीचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. मात्र पोलिसांच्या तपासात ही चोरी नसून चोरीचा बनाव असल्याचे लक्षात आले आणि व्यापाऱ्याच्या बनावाचा भांडाफोड झाला. शुभंत लिंगायत असे व्यापाऱ्याचे नाव आहे. विरारमध्ये राहणारा हा व्यापारी मुलीच्या लग्नासाठी जमविलेले दहा लाख रुपये बिटकॉइनमध्ये हरला होता; मात्र याबाबत घरी सांगता येणार नसल्याने आणि बायकोच्या कटकटीपासून वाचण्यासाठी त्याने या पैशांची चोरी झाल्याचा बनाव रचला. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसई पश्चिमेच्या पापडी परिसरातील साई सर्व्हिसमध्ये तो गाडी खरेदीसाठी टोकन देण्याच्या बहाण्याने गेला. रिक्षातून उतरताना त्याची दहा लाख रुपयांची बॅग एका चोरट्याने पळवली, असा त्याने प्लॅन आखला व तशी तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली. वसई पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली व सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी व्यापाऱ्याची कसून चौकशी केली असता पोलीसही चक्रावून गेले. मुलीच्या लग्नासाठी जमविलेले पैसे बिटकॉइनमध्ये हरल्याने त्याने हा चोरीचा बनाव आखल्याचे पोलीस तपासात उघड झाले. हा व्यापारी किराणा दुकानांना मालविक्रीचा व्यवसाय करीत असून बायकोच्या संतापापासून वाचण्यासाठी त्याने हा बनाव केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे.
बायकोच्या कटकटीपासून वाचण्यासाठी रचला चोरीचा बनाव; मुलीच्या लग्नाचे पैसे बिटकॉइनमध्ये हरला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:12 PM