मुंबई - वांद्रे येथे एका ४० वर्षीय महिलेची मदतीच्या नावाने १३ हजार ५०० रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेतील फिरोज खान आणि मजलूम गुलाम अशा दोन आरोपींची नावे आहेत. बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वांद्रे पोलिसांनी या दोघांना अटक केली.
पीडित महिला ही गृहिणी असून ती वांद्रे पश्चिम येथे असलेल्या एका बँकेत ४० हजार रुपये जमा करण्यासाठी गेली होती. महिलेला मदतीची गरज असल्याचे हेरून फिरोज आणि मजलूम यांनी तिला मदतीसाठी विचारणा केली. मदतीच्या बहाण्याने त्यातील एकाने तिची पावती भरायला सुरुवात केली. महिलेचं लक्ष पावती भरण्याकडे गुंतलेलं आहे असं पाहून दुसऱ्याने तिच्याकडील ४० हजारांपैकी १३ हजार ५०० काढून घेतले. पैसे काढून घेतल्यानंतर त्यांनी पावती आणि उर्वरित रक्कम तिच्या ताब्यात दिली आणि तेथून पलायन केले. महिला पैसे जमा करण्यासाठी गेल्यानंतर कॅशिअरने तिला पैसे आणि पावतीवरील रक्कमेत तफावत असल्याचं सांगितलं. तेव्हा त्या दोघांनी आपले पैसे पळवल्याचं महिलेच्या लक्षात आलं. तिने त्वरित वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली. वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून फिरोज आणि मजलूमचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि आरोपींना जेरबंद केले.