मुंबई - पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेल्या राकेश आणि सारंग वाधवान माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीएमसी घोटाळ्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस कांजिराथिंनगल पाठोपाठ बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना अटक करण्यात आली होती, तर त्यापैकी जॉयला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पीएमसी बँकेचा संचालक सुरजीतसिंह अरोराला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सायंकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता आहे.
जॉयला या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून, त्याच्या चौकशीतून पीएमसी आणि एचडीआयएलमधील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे हाती लागू शकतात, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली होती. यात एचडीआयएलसोबत झालेले व्यवहार, कर्जाबाबत जॉयकडे अधिक चौकशी करणे सुरु आहे. शिवाय, बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याचे दिसून येत आहे. या व्यवहाराची माहिती जॉयने ३ वर्षे लपवून ठेवल्याने त्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांनी यावेळी नमूद केले.