मुंबई - ऐन सणासुदीच्या कालावधीत हजारो खातेदारांना आर्थिकदृट्या असहाय्य बनविलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅँकेच्या (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी जलद कार्यवाही करावी, या मागणीसाठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्त राजवर्धन यांन खातेदारांच्या तीन स्वतंत्र शिष्टमंडळाने गुरूवारी भेट घेवून गाऱ्हाणी मांडली. याप्रकरणाचा तपास जलदगतीने सुरु असून महिन्याभरात बॅँकेचे कामकाज पूर्ववत सुरु केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
अनिमियत कर्ज प्रकरणामुळे तोट्यात आलेल्या पीएमसी बॅँकेच्या ठेवीदारांवर आपली रक्कम काढण्यात गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध घातले आहेत, त्यामुळे त्याबाबत ठेवीदाराकडून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. त्यामध्ये राजकीय श्रेय घेण्यासाठी काही राजकारण्यांनी पुढाकार घेतला आहे. गुरूवारी मुंबई कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पीएमसी फोरम यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. बॅँकेवरील निर्बंध उठवून ती पुर्ववत सुरु करण्यासाठी आपल्याकडून या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येत आहे. तपासाची पूर्तता झाल्यानंतर महिन्याभरात रिर्जव बॅँकेकडून त्यावरील निर्बंध उठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितल्याचे चंदर पुरुस्वामी, गुरबीकरुम सिंग, एसपीएस यादव यांनी सांगितले.