मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस कांजिराथिंनगल पाठोपाठ बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना शनिवारी अटक करण्यात आली, तर जॉयला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच आज वरियमसिंगला कोर्टात हजार केले असता ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जॉयला शनिवारी पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तो या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असून, त्याच्या चौकशीतून पीएमसी आणि एचडीआयएलमधील ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे हाती लागू शकतात, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली. यात एचडीआयएल सोबत झालेले व्यवहार, कर्जाबाबत जॉयकडे अधिक चौकशी करणे बाकी आहे. शिवाय, बँकेकडून देण्यात आलेल्या कर्जाचा दुरुपयोग झाल्याचे दिसून येत आहे. या व्यवहाराची माहिती जॉयने ३ वर्षे लपवून ठेवल्याने त्याचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचेही पोलिसांनी यावेळी नमूद केले.यावेळी जॉयच्या वतीने राकेश सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जॉय हे केवळ बँकेचे कर्मचारी होते. त्यांना यात बळीचा बकरा बनविण्यात येत असून, त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा दावा त्यांनी केला आहे, तर पीएमसी बँकेने एचडीआयएलच्या संशयास्पद असलेल्या ४४ खात्यांबाबत माहिती मिळू नये, म्हणून २१ हजार कर्जखार्त्यांचा आभास निर्माण करणारी माहिती दिली. याबाबत थॉमससह बँकेच्या बोर्डावर असलेल्या सर्वांना हा गुन्हा असल्याची माहिती होती, तरीदेखील त्यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.यावर युक्तिवाद करताना सिंग यांनी सांगितले की, २१ हजार कर्जखात्यांचा आरोपच खोटा आहे, याबाबत कुठलाच उल्लेख दाखल गुन्ह्यात केला नाही. एचडीआयएलला दिलेले कर्ज सुरक्षित आहे. दिलेल्या कर्जाच्या बदल्यात दिलेली सुरक्षित अनामत ठेव ही अडीच पटीने जास्त आहे. जॉयविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे फक्त आरबीआयला कळविले नाही, यावर पोलीस दोष ठेवू शकतात, असे त्यांनी सांगितले. या युक्तिवादानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, जॉयला १७ तारखेपर्र्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार, त्याने आतापर्यंत हाताळलेल्या व्यवहारांची कसून चौकशी स्करण्यात येत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.बँकेसह एचडीआयएलमध्येही केले कामवरियमसिंग एचडीआयएलमध्ये २०१४ पर्यंत संचालक म्हणून काम करत होता. २०१४ मध्ये तो पीएमसीमध्ये मोठ्या पदावर तो रुजू झाला. तांत्रिकदृष्ट्या वर्षभर त्याने बँक आणि कंपनी अशा दोन्ही ठिकाणी काम केले. कंपनीत असताना बँकेकडून कर्ज मिळवण्यात आणि बँकेत आल्यावर कंपनीला कर्ज मंजूर करण्यात वरियमसिंगने महत्त्वाची भूमिका बजावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कंपनी तोट्यात आहे. याबाबत माहिती असतानाही त्याने कर्जाला विरोध केला नसल्याचेही समोर आले. त्यात कंपनी कधी तरी कर्ज फेडेल या आशेवर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले आहे. तर, जॉय १९८७ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. तेव्हा बँकेची एकच शाखा होती.माहीममधून केली अटकवरियमसिंग कर्तारसिंग (६२) हा अंधेरीत राहतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर तोही पसार झाला होता. शनिवारी तो माहिम चर्च परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीत त्याचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट होताच, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. चौकशीतून लवकरच संचालक मंडळावर अटकेची कारवाई होणार असल्याचे समजते.
वाधवा पिता-पुत्राची चौकशी सुरू
एचडीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवा हे पिता-पुत्र ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. घोटाळ्यासंबंधी जप्त केलेल्या कागदपत्रांद्वारे दोघांकडे चौकशी सुरू आहे.