मुंबई - हजारो कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार नीरव मोदीचा निकटवर्तीय सुभाष शंकर परब याला सीबीआयच्या टीमने कैरो येथून मुसक्या आवळून भारतात आणण्यात आले आहे. सुभाष शंकर परब हा नीरव मोदीच्या एका कंपनीमध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करत होता. नीवर मोदीच्या १३ हजार ५७८ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी त्याचा निकटवर्तीय सुभाष शंकर परब याच्या मुसक्या आवळणे हे केंद्रीय तपास यंत्रणांसाठी मोठे यश असल्याचे मानले जात आहे. सीबीआयची स्पेशल टीम सुभाष शंकर परब याला इजिप्तची राजधानी कैरो येथून घेऊन भारतात आली.
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने या कारवाईला दुजोरा देताना सांगितले की, सुभाष शंकर परब हा कैरोमध्ये राहत होता. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून भारतात आणण्यात आले आहे. सीबीआयची एक टीम त्याला आणण्यासाठी कैरो येथे गेली होती. ही टीम मंगळावारी सकाळी शंकरला घेऊन मुंबईमध्ये पोहोचली. आता सीबीआयसह बँक फसवणुकीसंदर्भात तपास करत असलेल्या इतर एजन्सींना अपेक्षा आहे की, सुभाष शंकर परबच्या चौकशीमधून या संपूर्ण प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळेल.
२०१८ मध्ये इंटरपोलने कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विनंतीवरून नीरव मोदी त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्यांचा निकटवर्तीय अधिकारी सुभाष शंकर परब याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती. तर डिसेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने संसदेत माहिती देताना गेल्या ५ वर्षांत बँक फसवणुकीच्या संदर्भातील ३३ आरोपी देश सोडून पसार झालेले आहेत.