पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याची पत्नी प्रीती चोक्सीही ईडीच्या रडारवर आली आहे. बँक घोटाळा प्रकरणात ईडी प्रीतीला आरोपी करणार असून दुसऱ्या आरोपपत्रात तिला आरोपी करण्यात येणार आहे. मेहुलला हा सर्वात मोठा दणका असल्याचं मनालं जात आहे. पंजाब नॅशनल बॅकेत १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करून मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहे. डॉमिनिकाच्या तुरुंगातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मेहुल चोक्सीला डॉमिनिका सरकारने घुसखोर म्हणून जाहीर केले. यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणी वाढणार असून भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून फरार झालेल्या मेहुलने कोट्यवधीची मालमत्ता पत्नी प्रीतीच्या नावे केली आहे. ही सर्व मालमत्ता परदेशात असून दुबईसह इतर ठिकाणी ही मालमत्ता आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्यात आली आहे. त्यामुळे ईडी प्रीतीवर कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पीएनबी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर मेहुल चोक्सीचं नाव चर्चेत आले होते. दरम्यान चोक्सी भारत सोडून फरार झाला. आरोपांआधीच चोक्सीने भारतातून पळण्याची तयारी केल्याचाही आरोप करण्यात आले. २०१७ मध्ये चोक्सीने एंटीगा अँड बारबुडाचं नागरिकत्व घेतलं होतं.
Hillingdon Holdings या कंपनीत प्रीतीचा मालकी हक्क असल्याचे आढळून आले आहे. २०१३ मध्ये प्रीतीने गीतांजली जेम्समध्ये काम करणाऱ्या डिओन लिलीची भेट घेतली होती. त्यानंतर सी. डी. शाह आणि सहकारी नेहा शिंदे यांना सोबत घेऊन प्रीतीने तीन ऑफशोर कंपन्या स्थापन केल्या होत्या. या शिवाय २०१४ मध्ये Hillingdon Holdings या कंपनीच्या बँक खात्यातून मोठी रक्कम वळविण्यात आली होती. ज्या कंपनीला ही रक्कम देण्यात आली, ती कंपनी गीतांजली ग्रुपशी संलग्न होती. काही कागदपत्रांची चौकशी केली असता ही रक्कम प्रीतीच्या नावावर पैसे ट्रान्स्फर केल्याचे आढळून आलं आहे. या कागदपत्रांवर प्रीतीची सही असल्याचंही आढळून आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.