नवी दिल्ली-
विषारी सापाच्या दंशानं दरवर्षी भारतात हजारो जणांच्या मृत्यूची नोंद होते. याला एक अपघात समजलं जातं. पण सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीसाठी एक धक्कादायक प्रकरण आलं आहे. यात एका विषारी सापाचा वापर एका महिलेला ठार करण्यासाठी 'हत्यार' म्हणून वापर करण्यात आला आहे आणि असं करणं हत्येचा गुन्हाच आहे. सुप्रीम कोर्टानं राजस्थानातील या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एनवी रमण्णा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?एका महिलेचा विवाह भारतीय सैन्यातील जवानासोबत झाला होता. पती सैन्यात असल्यानं तो घरी नसायचा. तर पत्नी आपल्या प्रियकरासोबत फोनवर तासंतास बोलत असायची आणि यालाच तिची सासू विरोध करत होती. संबंधित महिलेचे सासरे देखील नोकरीच्या निमित्तानं घरापासून दूर राहायचे. सासूच्या ओरडण्याचा आणि फोनवर बोलण्यासाठी केल्या जाणाऱ्या अडवणूकीचा त्रास सुनेली होऊ लागला. तिनं थेट आपल्या सासूला जीवे मारण्याचा प्लान बनवला. असा प्लान की ज्यानं सर्वच हैराण झाले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये म्हणून तिनं एका विषारी सापाच्या दंशानं सासूला जीवे मारण्याचा प्लान केला.
सुनेनं आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रांकरवी झुनझुनु जिल्ह्यातून एक विषारी साप मागवला. सापाला एका बॅगमध्ये ठेवण्यात आलं होतं. २ जून २०१८ साली रात्री साप ठेवण्यात आलेली बॅग सासूच्या जवळ ठेवली. सकाळी जेव्हा सासूचा मृत्यू झाल्याचं पाहिलं तेव्हा सुनेनं आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर सासूला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण तोवर तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी असं उघडकीस आणलं संपूर्ण प्रकरणराजस्थान आणि इतर राज्यांमध्ये सर्पदंशाची प्रकरणं तशी सामान्य आहेत. झुनझुनु जिल्हा पोलिसांना देखील हा अपघात असल्याचं वाटलं. पण ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी सून आणि एका व्यक्तीसोबत तब्बल १०० हून अधिक वेळा फोनवर संवाद झाल्याच्या मुद्द्यानं पोलिसांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. फोन रेकॉर्ड चेक केले असता दोघं बऱ्याच काळापासून दैनंदिन पातळीवर एकमेकांशी संपर्कात असल्याचं लक्षात आहे. संबंधित व्यक्ती दुसरंतिसरं कुणी नसून सुनेचा प्रियकर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. मग या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी संबंधित महिलेसह त्याच्या प्रियकर आणि मित्रांना अटक केली. इतकंच नव्हे, तर चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीच्या जोरावर पोलीस साप देणाऱ्या गारुड्यापर्यंत पोहोचली. या प्रकरणात गारुडी साक्षीदार बनला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.