मुंबई - घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरत रोहनलाल सिंग या ज्वेलर्स दुकान मालकाची दुकान बंद करून घरी जात असताना २०१० साली गोळ्या घालून हत्या करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष - ५ ने अटक केली आहे. नौशाद खान हा आरोपी रियाध येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ज्वेलर्स व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यापासून नौशाद हा २०१० पासून फरार होता. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१७ साली महंमद युसूफ रफिकउद्दीन मणियार यास जिवे मारण्याचा प्रयत्न नौशादने केला होता. याबाबत देखील घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१० साली हत्या करून नौशाद प्रथम त्याच्या उत्तर प्रदेशातील आझमगड येथे मूळगावी पळून गेला होता. तेथून तो सौदी अरेबियात वाहन चालकाची नोकरीसाठी गेला. सौदीहून आल्यानंतर तो गुजरातमध्ये वाहन चालकाची नोकरी करत होता. नंतर पुन्हा सौदीला गेला. २०१५ साली पुन्हा नौशाद आझमगड येथे आला. दरम्यान वादातून त्याने सख्ख्या मेहुण्याची हत्या केली आणि २०१७ ला नौशाद पुन्हा मुंबईत आला. गोवंडीत तो वाहन चालकाची नोकरी करत होता. त्यावेळी त्याने वीज चोरीप्रकरणी झालेल्या वादातून मणियार यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या कक्ष - ५ च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.