मीरारोड - मीरारोड पोलीसांनी यश - ९ ह्या आॅर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांना लपुन ठेवण्यासाठी केलेली इलेक्ट्रॉनिक दरवाजाची गुप्त खोली व अंतर्गत बेकायदा बांधकामावर सोमवारी पालिकेमार्फत तोडक कारवाई केली. त्या आधी धाड टाकून बारबालांसह २२ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
मीरारोडच्या शितल नगरमध्ये शाही हॉटेलच्या बाजूला यश - ९ या आॅर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा अश्लील नृत्य तसेच मोठ्या संख्येने बारबाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांना मिळाली होती. पोलिसांनी बारवर धाड टाकली असता अश्लिल चाळे करणाऱ्या चौघा बारबालांसह बार कर्मचारी व ग्राहक मिळुन २२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान बारमध्ये अनेक अंतर्गत बेकायदा बदल केल्याचे तसेच बारबालांना लपवून ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक दार असलेली गुप्त खोली आढळून आली होती. याबाब पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पालिका आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले होते. मीरारोड पोलीसांनी सुध्दा या आधी पालिकेला पत्र व्यवहार केला होता. पण पालिकेने डोळेझाक केली होती. अखेर डॉ. राठोड यांनी कारवाई करण्यास सांगितल्यावर पालिका प्रशासनाअंतर्गत बांधकामे तसेच गुप्त खोलीचे बांधकाम तोडले.