नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी एका महिलेच्या हत्येने पोलिसांना हैराण केले आहे. दिल्लीत भररस्त्यात एका महिलेला गोळी मारण्यात आली. गोळी मारून आरोपी तिथून निघून जातो. त्यानंतर आरोपी त्याच्या घरी पोहचतो आणि स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या करतो. त्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करायला सुरुवात करतात.
दिल्लीच्या डाबरी परिसरातील वैशाली नावाचा भाग आहे. ज्याठिकाणी गोयल कुटुंब राहते. कुटुंबातील प्रमुख डी. पी गोयल एक बिल्डर आहेत. गोयल कुटुंब खूप चांगले होते, त्यांचे कुणाशीही वैर नव्हते. दोघं पती-पत्नी एकमेकांशी प्रेमाने वागत. डी. पी गोयल आणि रेणू यांना ३ मुले होते. २७ जुलै रात्री साडे आठपर्यंत सर्वकाही ठीक सुरू होते. परंतु पुढे येणाऱ्या संकटाबाबत कुणालाही भनक नव्हती. पुढे जे घडणार त्याचा विचारही कुणी केला नसेल.
२७ जुलै २०२३
रात्री ८ वाजून ३५ मिनिटे झाली होती. वैशाली परिसरात नेहमीप्रमाणे लोक आपापल्या कामात व्यस्त होते. तेव्हा डी.पी गोयल यांच्या घराजवळ एक महिलेला अज्ञात व्यक्तीने गोळी मारली. गोळी लागताच ती महिला जमिनीवर कोसळली. तिच्या शरीरातून रक्त वाहत होते. ती वेदनेने किंचाळत होती. पाण्याविना माशाची जी अवस्था होते तशी ती तडफडत जमिनीवर पडली होती. त्यानंतर अचानक तिची हालचाल बंद झाली. हल्लेखोर तिथून फरार झाला होता. गोळीचा आवाज ऐकून आसपासचे लोक त्याठिकाणी जमले. हे भयानक दृश्य पाहून सगळेच भयभीत झाले होते.
पुन्हा गोळीबार
रस्त्यावर जमलेल्या लोकांना काही कळायच्या आधीच अचानक पुन्हा एकदा गोळीचा आवाज आला. हा आवाज एका उच्चभ्रू इमारतीतून आला होता. घटनास्थळापासून काहीच अंतरावर पुन्हा गोळीबार झाला होता. लोकं त्याठिकाणी धावले. इमारतीच्या वरच्या मजल्यावर युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. शेजारीच एक पिस्तुल पडली होती. युवकाचा मृतदेह पाहून त्याने स्वत:वर गोळी झाडल्याचे लोकांना वाटले. हा तोच युवक होता ज्याने महिलेला गोळी मारून तिची हत्या केली होती.
पोलीस घटनास्थळी पोहचले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपासाला सुरुवात केली. मृत महिला आणि युवक यांची ओळख पटवण्यात आली. तपासात ज्या महिलेला गोळी मारली ती ४२ वर्षीय रेणू गोयल होती, जी डी.पी गोयल यांची पत्नी होती. तर रेणूची हत्या करणारा दुसरा कुणी नसून तिच्याच शेजारी राहणारा युवक आशिष होता. ज्याने घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
हत्या अन् आत्महत्या, पोलिसांसमोर ५ प्रश्न
पोलिसांना मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवले. नेमकी ही घटना का आणि कशासाठी घडली हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले. त्यांच्यासमोर ५ प्रश्न निर्माण झाले.
- आशिषने रेणू गोयलची हत्या का केली?
- आशिष रेणू यांच्यात काय शत्रूता होती?
- ही घटना पूर्ववैमनस्यातून की एखाद्या व्यवहारातून झाली?
- या घटनेमागे दुसरीच कहाणी तर नाही?
- रेणू गोयलच्या हत्येमागे काय उद्देश होता?
आशिषचे वडील जितेंद्र लेबर सप्लायचे काम करतात. आशिष आणि रेणूची ओळख जीममध्ये झाली होती. रेणूसोबत कधी कधी डी. पी गोयलही जीमला जायचे. परंतु रेणू नेहमीच जीममध्ये जायची. त्या काळात रेणू आणि आशिष यांच्यात मैत्री झाली. पोलिसांनी जीम मालक, कर्मचारी यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत. पोलिसांनी मृत रेणू आणि आशिष यांचा फोन जप्त केला आहे. ही हत्या आणि आत्महत्या का झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.