डोंबिवली: करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रूपयांची फसवणूक करणा-या पवन बापुराव पाटील (वय 28) या भोंदूबाबाला रामनगर पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराला करणी काढण्याबरोबरच कॅन्सर उपचाराच्या नावाखाली गंडा घातला गेला आहे.
तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगत पवनने कळवा येथे राहणा-या प्रियंका राणेसह डोंबिवलीतील तीच्या आईच्या बँक खात्यातून 31 लाख 6 हजार 874 रूपये वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाईनद्वारे ट्रान्सफर करवून घेतले होते. त्याचबरोबर 1 लाख 9 हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तूही त्याने घेतल्या. फसवणूकीचा प्रकार लक्षात येताच प्रियंकाने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दरम्यान याची खबर पवनला लागू न देता प्रियंकाने त्याला डोंबिवलीत बोलावून घेतले आणि तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पवन हा अविवाहीत असून तो त्याच्या जळगावच्या गावी दरबार भरवायचा अशीही माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान पोलिस निरिक्षक सुरेश सरडे यांचे पथक अधिक तपासासाठी जळगाव येथे रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.
वडिलांचा आजार बरा करतोप्रियंकाच्या वडिलांना कॅन्सर होता. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे माझ्या उपचाराने तुमचे वडील कॅन्सरमुक्त होतील असे पवनने तीला सांगितले आणि उपचारासाठी काही पैसे घेतले. परंतू वडील त्या आजारातून बरे झाले नाही त्यात त्यांचा मृत्यू झाला. कोणी तरी तुमच्या वर करणी केली आहे हे सांगून पवनने प्रियंकाचा विश्वास संपादन करीत तिच्याकडून पुन्हा पैसे घेतले. त्याने या कुटुंबियांकडून जवळपास 32 लाख रुपये उकळले आहेत.मित्रानेच फोडले बिंगपवनच्या मित्रानेच त्याचे बिंग फोडत प्रियंकाला त्याच्या बनवेगिरीची माहीती दिली. त्याचबरोबर कोपरखैरणे येथील एका महिलेकडूनही तीला सर्वकाही सांगण्यात आले. तेव्हा प्रियंकाने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली.