पालघर - सर्वत्र मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पोलीस सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्यावर आहेत. माणुसकी जपत पोलिसांनी गरजू आणि निराधार महिला मुलांसोबत त्यांना भेटवस्तू देऊन एक अनोखी दिवाळी साजरी केली आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोन्सालो आश्रम शाळा किल्ला बंदर येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारोटी आदिवासी वाडीत आदिवासी बांधवाना दिवाळीचा फराळ आणि मिठाई वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे धुंदलवाडी येथे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या वतीने नरेश वाडी आश्रमशाळेत अनाथ मुलामुलींना दिवाळीचे फराळ आणि फटाके देण्यात आले. मदर तेरेसा वृद्धाश्रमात फराळ तर कंक्राडी डोंगरीपाडा या गावातील आदिवासी व गरीब महिलांना साडी व मिठाई आणि लहान मुलांना कपडे, मिठाई देण्यात आली.