धनकवडी : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात सहकारनगर पोलिसांनी यश मिळाले आहे. कृष्णा बबन लोखंडे वय २० वर्षे , राहणार शनिनगर आंबेगाव खुर्द असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व एक जिंवत काडतुस जप्त करण्यात आले.
सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक प्रकाश मरगजे यांना त्यांच्या खास बातमीदांकडून भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार लोखंडे हा तळजाई शेवटचा बस थांबा येथे देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.
सहकारनगर पोलीस स्टेशन तपास विभागाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस नाईक प्रकाश मरगजे यांनी तळजाई वसाहती मध्ये सापळा रचून लोखंडे याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून पिस्तूल व एक काडतूस जप्त केले.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संजय शिंदे, परिमंडळ २ पुणे चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे , सहा. पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक , तसेच तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक गौरव देव व पोलीस नाईक प्रकाश मरगजे यांनी केली.