पिंपरी : सराईत आरोपीला गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत कडतुसांसह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निगडी पोलिसांनी बुधवारी रात्री केली. चिखली येथे आरोपींकडून एकूण ४५ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संजय दामू नानेकर (वय २१, रा. चाकण, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरी, सोनसाखळी चोरी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी निगडी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ही पथके निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पथकातील पोलीस नाईक संदीप पाटील यांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की, एक इसम चिखली येथे थांबला आहे. त्याच्याजवळ गावठी पिस्तुल आहे. त्यानुसार वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन चिखली रस्त्यावर सापळा लावून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४५ हजार २०० रुपयांचा ऐवज मिळाला. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनवणे, पोलीस कर्मचारी तात्या तापकीर, संदीप पाटील, किशोर पढेर, विलास केकाण, आनंद चव्हाण,चेतन मुंढे स्वामीनाथ जाधव, मच्छिंद्र घनवट यांच्या पथकाने केली.