डोंबिवली: मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरीचे गुन्हे वाढले असताना स्थानिक पोलीसांनी या गुन्हयांचा कसोशिने तपास करीत चोरीच्या प्रकरणातील तब्बल 12 आरोपींना अटक केली आहे. हे चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या चौकशीत 8 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे.
कल्याण डोंबिवलीत चोरी, घरफोडी, सशस्त्र दरोडा, सोनसाखळी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली असताना कल्याण पुर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसात 11 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान चोरीच्या वाढलेल्या घटनांवरून स्थानिक पोलीसांनी नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन राबविले त्याचबरोबर रेकॉर्डवरील चोरीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत त्यांची शोध मोहीम राबविली. यात हद्दीत घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, प्राणघातक हल्ला करणा-यांना अटक करण्यात आली आहे. कल्याण शीळ मार्गावर मोबाईल दुकानाचे शटर उचकटून 3 लाख 36 हजार 377 रूपये किमतीचे मोबाईल, एलसीडी टिव्ही असा मुद्देमाल चोरणा-या शहजाद अन्सारी, समीर शेख आणि सद्दाम शेख या तिघांना मुंबई गोवंडी येथून अटक करीत त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेल्या रिक्षासह चोरी केलेला 1 लाख 18 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या गुन्हयात शेहजाद शेख, मुमताज शेख, इम्रान खान, इरफान शेख या चौघांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 10 मोबाईल, लॅपटॉप, म्युझीक सिस्टिम, बॅट-या आणि रोकड असा 62 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्हयातील विनय प्रजापती, सुनिल जैस्वार आणि भावेश भोईर यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि गुन्हयात वापरलेली रिक्षा असा 1 लाख 7 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 7 नोव्हेंबरला कैलास भंडारी याच्यावर वार करून पसार झालेल्या कृष्णा कुशलकर आणि शुभम पेटेकर या दोघांनाही पुणे येथुन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरिक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, पोलीस निरिक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश डांबरे आणि पोलीस उपनिरिक्षक अनंत लांब आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.