पुणे - कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपयांच्या लुटीप्रकरणी एटीएम केंद्रातून पैसे काढणा-या टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. दोघांनी तब्बल 53 लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. सलमान मोहम्मद नईम बेग (वय 31), शेहबाज फारूक शेख (वय 29, रा. अंबर व्हिला, रा. मुंब्रा ठाणे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. मागील वर्षी (ऑगस्ट 2018) गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विचवर (सर्व्हर) हल्ला चढवून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये पळविले होते. सायबर चोरट्यांनी मालवेअरवर हल्ला करून त्याव्दारे व्हिसा व रूपे डेबीट कार्ड धारकांची माहिती चोरली होती. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकाची (एसआयटी) नेमणूक केली होती. तपासात देशातील कोल्हापूर, मुंबई तसेच अजमेर व इंदौर शहरातील एटीएम केंद्रातून काही रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले होते. तांत्रिक तपासानुसार पोलिसांनी यापुर्वी 13 आरोपींना अटक केली होती. इतर आरोपींचा शोध घेतला जात असून तपासात इंदौर येथून पैसे काढणा-यांची माहिती घेत असताना टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार दोघे आरोपी ठाण्यात असल्याचे समजले. त्यानुसार, सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने या दोघांना अटक केली. दोघांनी साथीदारांच्या मदतीने इंदौरमधून तब्बल 53 लाख 72 हजार काढल्याचे समोर आले आहे. दोघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कॉसमॉस बँक सायबर हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 9:20 PM
दोघांनी तब्बल 53 लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे.
ठळक मुद्देदोघांना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दोघांनी साथीदारांच्या मदतीने इंदौरमधून तब्बल 53 लाख 72 हजार काढल्याचे समोर आले आहे.