कल्याण - तुमच्या घरच्या दारावर कोणी मूक - बधिर असल्याचे भासवून भीक मागण्यासाठी कोणी येत असेल तर सावधान. कारण मूकबधिर असल्याचे बनाव रचून भीक मागण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्याना खडकपाडा पोलिसांनीअटक केली आहे. सत्यराज बोयर आणि बाबू बोयर अशी या चोरट्यांची नावं आहेत.हे दोघे मुके असल्याचे भासवून भिक मागण्यासाठी जायचे. तसेच त्यांच्याजवळ एक पिवळया रंगाचे “भारत सरकारकडून मिळालेले सर्टीफिकेट ” नावाचा बनावट कागदही असायचा. ज्यामध्ये ही व्यक्ती मुकी असून त्याच्या घरातील सदस्यांना हात-पाय नाहीत, आईने आत्महत्या केल्याचा पत्रात उल्लेख असायचा. भिक मागण्यासाठी जाणाऱ्या ठिकाणी लोकांना हे पत्र वाचण्यात देऊन आर्थिक मदतीसाठी याचना करायचे. एखाद्याने दया दाखवून मदत करण्यासाठी दरवाजा उघडा ठेवला तर दुसरा साथीदार घरातल्या व्यक्तीची नजर चुकवून घरात प्रवेश करायचा आणि मोबाईल किंवा किमती वस्तू चोरी करून पळ काढायचा. अशी या लोकांची चोरी करण्याची पद्धत होती. या चोरट्यांच्या मूक - बधिरपणाच्या नाटकाला भुलून अनेक जणांनी आपले मोबाईल आणि किमती वस्तू गमावल्या आहेत. खडकपाडा पोलिसांनी या दोघांकडून तब्बल 31 मोबाईल आणि 1 कॅमेरा असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या लोकांनी आणखी किती लोकांच्या घरी अशाप्रकारे चोरी केली आहे याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.
तर आशिष उर्फ आशु राजकुमार राजोरीया, मनोज कोनकर हे घरफोडीच्या गुन्ह्यामधील आरोपीनाही खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घराची कडी उघडून 152 ग्राम सोन्याचे दागिने, 8 ग्राम चांदीचे दागिने आणि 8 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. खडकपाडा पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशमधून आशु राजोरीयाला पकडले. त्याच्याकडून 113 ग्रॅम सोन्याचा ऐवज हस्तगत केला असून दुसऱ्या गुन्ह्यामध्ये चोरट्याने घराचे लॉक तोडून टीव्ही, फ्रीज चोरून तर नेलेच पण घरालाही आग लावली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मनोज कोनकरला बेड्या ठोकत त्याच्याकडून टीव्ही आणि फ्रीज हस्तगत केला आहे.