लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): वृद्ध महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांची फसवणूक करत सोन्याचे दागिने लंपास करणारी चौघांची टोळी माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड केली आहे. या चारही आरोपींकडून सहा गुन्ह्यांची उकल करून सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत माणिकपूर पोलिसांनी दिली आहे.
वसईच्या दिवाणमान येथील अनुराधा विशाखा सोसायटीत राहणाऱ्या जयश्री कृष्णा मुगजी (६४) या २८ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास मधुरम हॉटेल शेजारी, जुन्या आयसीआयसीआय बँकेजवळून जात असताना दोन आरोपी पुरुष व एका महिलेने दागिने विकत घेतो असे आमिष दाखवून त्यांचे ७५ हजार रुपये किमतीचे अंगावरील दागिने काढून घेऊन कागदी खोटे पैसे देत फसवणूक केली होती. माणिकपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्हयातील आरोपी हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई परिसरामध्ये वारंवार अशाप्रकारचे गुन्हे करत असल्याने वरिष्ठांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी विजय विनोद सोळंखी ऊर्फ विजय रमेश चव्हाण (२०), हरीश रामा राठोड ऊर्फ हरीश विष्णु राठोड (२८), रवि पेलहाद राठोड (२८) आणि श्रीमती चौथी बालकिशन परमार ऊर्फ चौथी नारायण सोलंकी (३४) या चारही आरोपींना विरार पूर्व येथे सापळा रचुन शिताफीने अटक केली आहे.
आरोपी व त्यांचे सहकाऱ्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई परिसरामध्ये परिसरात अशाच प्रकारचे अनेक गुन्हे करुन वृद्ध महिलांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून अंदाजे ५९ ग्रॅम वजनाचे २ लाख ९५ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीकडुन सहा गुन्ह्यांची उकल केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, धनंजय चौधरी, अनिल चव्हाण व प्रविण कांदे यांनी केली आहे.