कल्याण - बंद दुकानं आणि घरांमध्ये घरफोडी करणाऱ्या ७ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 22 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 2 एलईडी टीव्ही, 2 संगणक आणि एक महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण 6 लाख 84 हजार 522 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी दिली.
सोनू राजकुमार गौतम (वय - 19), राकेश रामचंद्र राजभर (वय - 32), संदिप धनिकलाल साहू (वय - 22), जितेश उर्फ जितू शशी दुसगे (वय - 39), राजेश रामचंद्र राजभर (वय -28), छोटेलाल बिपेती शर्मा (वय - 42), रामकीशन रामआचल यादव (वय - 40) अशी अटक आरोपींची नावे असून हे नालासोपारा, दहिसर आणि घोडबंदर परिसरात राहणारे आहेत. या आरोपींकडून महात्मा फुले पोलीस चौक (कल्याण), उमरगाव पोलीस ठाणे वलसाड (गुजरात), तुळीज पोलीस ठाणे (नालासोपारा), विरार पोलीस ठाणे, मालाड पोलीस ठाणे या पोलीस स्थानक हद्दीतील चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
20 जुलै रोजी कल्याणमधील दत्ता थोरात यांनी दिलेल्या घरफोडीच्या तक्रारीनुसार तपास करताना सहाय्य्क पोलीस निरीक्षक एस. डी. डांबरे यांनी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मोबाईलच्या नंबरवरून कॉल रेकॉर्डिंग प्राप्त करत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्यासह अन्य आरोपींची नावे सांगितली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धरणे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक डांबरे, किरण वाघ आदींच्या पथकाने इतर आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केले.रात्रीच्यावेळी बंद दुकाने आणि घराची रेकी करून ही टोळी चोऱ्या करायची. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांनी विविध गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगली असून यातील एका आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली असल्याची माहिती लोंढे यांनी दिली.