जयंत धुळप
अलिबाग - गेल्या 29 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवली गावांतील ज्ञानदीप सोसायटी या भागातील महेश जयराम देशमुख यांच्या श्रीमंत निवास या बंगल्यात खिडकी वाटे प्रवेश करून घरातील महेश जयराम देशमुख, त्यांच्या पत्नी, आई व मुलांचे हातपाय दोरीने बांधून जीवे ठार मारण्याची धमकी देवून सात दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 6 लाख 28 हजार 500 रुपयांचा ऐवज दरोडा टाकून लंपास केला होता. या दरोडय़ाचा केवळ 21 दिवसांत कसोशीने तपास करुन या दरोडय़ातील पाच दरोडेखोरांसह, सोन्याचे चोरिचे दागीने विकत घेणारे मुंबईतील दोन सोनार अशा सात जणांना गजाआड करण्यात तसेच 221 ग्रॅम सोन्यासह 5 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज परत मिळवण्यात रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले असल्याची माहिती रायगडचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ दहा दिवसात गुन्ह्यातील पहिले दोन आरोपीं अटक
गंभीर स्वरुपाच्या या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी कजर्त उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरिक्षक जे.ए.शेख यांना दिले होते.उप विभागीय पोलीस अधिकारी नारकुल यांनी दरोडय़ाच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर उलगडा होण्या करिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि शेख यांच्या नेतृत्वाखाली नियूक्त केलेल्या विशेष पोलीस पथकाने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीं बाबत गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे माहिती संकलित करुन गुन्हा दाखल झाल्यापासून पहिल्या केवळ दहा दिवसाच्या आत गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले.
एकूण 5 लाख 94 हजार 075 रुपयांचा ऐवज हस्तगत
ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपिंकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्ह्यातील एकूण आठ आरोपिताना निष्पन्न केले असून त्यापैकी तिन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपितांकडून त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम व सोन्याच्या एवजाची कशी विल्हेवाट लावली या बाबत माहिती प्राप्त करण्यात आली आहे. आरोपितांकडून 18 हजार रु पयांची रोकड ह्स्तगत केली. तसेच आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागीने मुंबईतील ज्या दोन सोना:यांना विकले होते त्यांची माहिती घेऊन त्या दोन्ही सोनारांना देखील अटक करून त्यांच्याकडून 5 लाख 54 हजार 475 रुपये किमतीच्या 221.790 ग्रम वजनाच्या सोन्याच्या तिन लगडी हस्तगत करण्यात आल्या असून या दरोडा प्रकरणी आता र्पयत पाच आरोपी यांना अटक करण्यात आली असून एकूण 5 लाख 94 हजार 075 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अभिलेखातील टोळीने गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार
गुन्ह्यातील अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे ‘टोळीने गुन्हे करणारे’ अट्टल गुन्हेगार असून प्रत्येकाविरुद्ध 3 ते 20 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. विशेष म्हणजे आरोपी हे सराईत असल्याने त्यांनी गुन्हा करताना स्वत:च्या चेहर्यावर मास्क व हातात सॉक्स घालून, मोबाईल फोन घटनास्थळी न आणता विशिष्ट काळजी घेऊन कोणताही पुरावा न सोडता हा दरोडा घातला होता. निवासी संकुल असणाऱ्या परिसरात दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना व आरोपिंनी कोणताही पुरावा मागे ठेवला नसताना कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे.