लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: डांगेवाडी येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेच्या बंद घरात लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी १० ते १७ जुलै दरम्यान झाली होती. ही घरफोडी करणाऱ्या महिलेला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील डांगेवाडीच्या नूर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मरियम खान (५६) यांच्या घरी १० ते १७ जुलैच्या दरम्यान लाखोंची घरफोडी झाली आहे. त्या बकरी ईद सणानिमित्त माहीम येथे राहणाऱ्या मुलांकडे घर बंद करून गेल्या होत्या. त्यादरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा लॉक बनावट चावीने उघडून घरात प्रवेश केला होता. बेडरूममधील लोखंडी कपाट आणि किचनमधील लाकडी कपाट तोडून लॉकरमधून ७ लाख ४४ हजार ६५६ रुपये किंमतीचे २०६.६४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तपासाला सुरुवात केली.
घटना स्थळावरील प्राप्त पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना एका बुरखाधारी महिलेने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. सदर आरोपी महिला माहीम येथे राहणारी असल्याची माहिती मिळाल्यावर तिला त्याठिकाणाहुन ताब्यात घेऊन २५ जुलैला अटक केली. तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी महिलेला वसई न्यायालयात हजर केल्यावर १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. सदर महिलेकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रेस नोट काढून दिली आहे.