अमेरिकेने भारतात परत पाठवून दिलेल्या अवैध प्रवाशांपैकी दोघांना पटियाला पोलिसांनी अटक केली आहे. हत्या प्रकरणातील आरोपी जे अमेरिकेला पळून गेले होते ते पोलिसांना दोन वर्षांनी सापडले आहेत. संदीप आणि प्रदीप असे या दोन आरोपींची नावे आहेत.
अमेरिकेने हातकड्या आणि पायात साखळदंड घालून शनिवारी ११६ अवैध भारतीयांना लष्करी विमानातून पाठवून दिले होते. यामध्ये हे दोघे होते. या प्रवाशांची यादी अमेरिकेने भारत सरकारला दिली होती. ही यादी सुरक्षेच्या कारणासाठी तसेच या लोकांची जाण्या-येण्याची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. यामध्ये या दोन गुन्हेगारांची नावे देखील होती.
संदीप आणि प्रदीपवर राजापुरामध्ये एका व्यक्तीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून हे दोघे फरार होते. ते आपसुकच पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत.
यापूर्वी ५ फेब्रुवारीला अमेरिकेने पहिले विमान पाठविले होते. त्यातून १०४ जण भारतात आणले गेले होते. आता ही दुसरी ट्रिप आहे, तर तिसरे विमान अमेरिकेहून १५७ भारतीयांना घेऊन निघाले आहे. ते आज भारतात येण्याची शक्यता आहे. यामध्ये हरियाणा 59, 52 पंजाब , 31 गुजरात आणि इतर अन्य राज्यांतील असणार आहेत.
अमेरिकी सैन्याचे सी १७ विमान शनिवारी रात्री साडे अकरा वाजता अमृतसर विमानतळावर उतरले. या विमानात पंजाबचे ६५,हरियाणाचे ३३, गुजरातचे ८, युपी-महाराष्ट्र व राजस्थानचे दोन-दोन, हिमाचल, गोवा, जम्मू काश्मीरचा प्रत्येकी एक व्यक्ती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदींची चर्चा झाल्याने यावेळी भारतीयांना अशी वागणूक मिळणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. परंतू, अमेरिकेने पुन्हा एकदा भारतीयांना एलियन सारखी वागणूक दिली आहे. तसेच कोणत्याही देशाचा नागरिक अमेरिकेत घुसला तर त्याला हीच वागणूक मिळणार असल्याचे देखील भारतासह सर्व देशांना स्पष्ट केले आहे.