ठाणे - नौपाड्यातील एका २७ वर्षीय तरुणीला मेसेज पाठवून व्हॉट्सअॅप कॉल करून अश्लील बोलून नेहमीच पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या राम लाळगे (३५, रा. इंदिरानगर, ठाणे) या कपडेविक्रेत्याला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
पीडित तरुणीची आणि यातील कथित आरोपी राम यांची आधी ओळख होती. याच ओळखीतून त्यांच्यात मैत्रीही झाली. या मैत्रीचा गैरफायदा त्याने मार्च २०१९ पासून त्याच्या अन्य एका मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला तसेच तिच्या आई, बहीण तसेच संगीत शिकविणारे शिक्षक आणि तिच्या कामावरील वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून तिच्याबद्दल अश्लील बोलून तिची बदनामी केली.
तसेच १४ मार्च ते १४ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये तिला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मेसेज करून तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. एवढ्यावरच न थांबता तिचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग करीत तिची बदनामीही केली. सततच्या या प्रकारामुळे ही तरुणी आणि तिचे कुटुंबीय भीतीच्या छायेत होते. अखेर वारंवार होणाऱ्या या सर्व प्रकाराला कंटाळून या पीडित तरुणीने अखेर याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला १८ डिसेंबर रोजी ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. १९ डिसेंबर रोजी त्याला ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे.