दिल्लीतील बिंदापूर भागात आपल्याच आईच्या घरात चोरी करणाऱ्या महिलेला द्वारका पोलिसांनी अटक केली आहे. श्वेता असं आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेने बुरखा घालून हा गुन्हा केला. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवली. पोलिसांनी महिलेकडून दागिने, साडेनऊ हजार रुपये आणि बुरखा जप्त केला आहे.
डीसीपी द्वारका अंकित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी सेवक पार्क उत्तम नगरमध्ये राहणारे कमलेश यांनी त्यांच्या घरात चोरीची तक्रार दाखल केली होती. घरातून लाखोंचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. या प्रकरणी बिंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. द्वारका जिल्ह्यातील अँटी व्हर्गलरी सेलचे प्रभारी विवेक मंदोला यांच्या टीमला घराचा मुख्य दरवाजा व कपाटाचं कुलूप तुटलेलं आढळून आलं नाही.
घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये काळ्या बुरख्यात एक महिला संशयास्पदरीत्या घरात शिरताना दिसली. टेक्निकल सर्व्हिलान्सच्या मदतीने पोलिसांनी या महिलेची ओळख पटवून तिला पकडले. ती तक्रारदार महिलेची मोठी मुलगी असल्याचं निष्पन्न झालं. आरोपी मुलीची चौकशी केली असता, तिने उघड केले की, तिची आई तिच्या लहान बहिणीवर जास्त प्रेम करत होती. त्यामुळे तिच्या लहान बहिणीबद्दल मत्सर आणि द्वेषाच्या भावना वाढत गेल्या. दरम्यान, काही कर्जही झालं. यामुळे तिने आईच्याच घरी चोरीचा कट रचला.
महिलेने आपलं घर शिफ्ट केलं. घर बदलण्याच्या बहाण्याने तिने आईला घरी बोलावलं. त्यानंतर आईच्या घराच्या चाव्या चोरल्या. भाजी आणण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली. तिने उत्तम नगर पश्चिम येथील शौचालयात कपडे बदलले आणि बुरखा घातला. त्यानंतर या घटनेनंतर ती पुन्हा शौचालयात आली, कपडे बदलून घरी गेली. तिने हे दागिने एका ज्वेलर्सला विकल्याचं सांगितलं.