फरिदाबाद - भोळाभाबडा चेहरा पाहून एका तरुणीला लिफ्ट देणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. साध्याभोळ्या दिसणाऱ्या या तरुणीने गाडीत बसताच आपले खरे रूप दाखवत पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करीन अशी धमकी देत या तरुणीने त्याच्याकडील रोख रक्कम आणि एटीएममधून बँक खात्यात असलेली रक्कम काढून घेतली आणि पोबारा केला. दरम्यान, या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर एनआयटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय चरण सिंह हे पोलिसांच्या मिसिंग विभागात तैनात आहेत. शनिवारी दुपारी ते एनआयटी-5 मधील नीलम चौकजवळ एका ज्युसच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांना एक तरुणी भेटली. तिने त्यांच्यासोबत बोलण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या पतीची तब्येत बिघडली असून, आपल्याला तातडीने वल्लभगड येथे जायचे आहे, असे सांगितले. तिचा साधाभोळा चेहरा पाहून सिंह यांनी तिला लिफ्ट देण्याचे मान्य केले. मात्र कार काही अंतरावर पोहोचल्यानंतर या तरुणीची देहबोली बदलली. तिने या पोलीस अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करून आरडाओरडा करण्याची धमकी दिली.तिच्या या वागण्यामुळे पोलीस अधिकारी असलेले सिंह गोंधळले. या तरुणीने त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचे डेबिट कार्ड घेऊन एटीएममधूनही रोख रक्कम काढली. तसेच आडवाटेला कार थांबवून पसार झाली. दरम्यान, या तरुणीचे नाव सुनीता असल्याचे पीडित अधिकाऱ्याने सांगितले असून, तिचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भोळाभाबडा चेहरा पाहून लिफ्ट दिली, पोलिसालाच लुटून ती पसार झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:29 PM