नालासोपारा - सोमवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांची प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या विरारहून चर्चगेटला जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी धावणारा प्रवाशी पडला आणि लोकल ट्रेनसोबत फरफटत जात होता. त्याचवेळी ड्युटीवर तैनात असणाऱ्या शीघ्र दलाचा रेल्वे पोलीस कर्मचारी पंकज कुमार यांनी पाहिले व धावत जाऊन प्रवाशाला बाजूला खेचून त्याचा जीव वाचवला आहे.
या दुर्घटनेत प्रवाशाच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने पंकजने जखमी प्रवाशाला डॉक्टरकडे नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्या प्रवाशाची विचारपूस केल्यावर तुषार गजानन देवरुखकर (42) असे त्याचे नाव असून तो विरार पूर्वेकडील मनवेल पाडा येथील न्यू अनुरुध्य सोसायटीच्या सदनिका नंबर 204 मध्ये राहतो. त्याचा जीव वाचवल्याबद्दल पंकज आणि रेल्वेपोलिसांचे आभार मानले आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.