नवी दिल्ली - सध्या ऑनलाईन वस्तू मागवण्यासकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. ई-कॉमर्स कंपन्या देखील विविध प्रकारच्या भन्नाट ऑफर्स आणि मोठी सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करत असतात. पण याच दरम्यान अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडतात. तर काही जण या ऑनलाईन पद्धतीचा चुकीचा वापर करतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉनवरून चक्क एक टन गांजाची तस्करी करण्यात आली आहे. पोलिसांनी या ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने कढीपत्त्याच्या नावाने थेट गांजाची विक्री केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाईन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक बृजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून जवळपास 20 किलो गांजा जप्त करण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.
कढीपत्ता विक्रीच्या नावाखाली गांजा तस्करी
"आरोपी कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाईन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात बृजेंद्र हा कल्लूला मदत करायचा. कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे" अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली
कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली. आरोपी एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून त्यांची टोळी चालवत होते आणि या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का याबाबत तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.