पाथरी (जि. परभणी) : शेत धुऱ्यावर उगवलेले चंदन शेतीकामासाठी १२०० रुपयांना विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चंदन चोर ठरवून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये पाथरी पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांनी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जैतापूरवाडी येथील शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी येथील शेतकरी किशन लक्ष्मण यादव यांनी विकलेली झाडे तोडल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतमालक किशन यादव आणि शेतात काम करणारे उमेश खुणे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर मुंजाभाई टाकळकर यांच्या मध्यस्थीने १ लाख २० हजार रुपये घेतले. शेतकरी गरीब कुटुंबातील असल्याने ग्रामस्थांनी ही रक्कम जमा करून दिली होती.
शेतकऱ्यांना चंदन तस्कर ठरवून पोलिसाने उकळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 6:23 AM