अझहर शेखनाशिक : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेत (बीएचआर) झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य संशयित असलेल्या सुनील देवकीनंदन झंवर (५९) हा मागील दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ज्या घरात तो विश्रांतीसाठी थांबला त्याच घराच्या बाल्कनीत मंगळवारी (दि.१०) सकाळी झंवर याने धूम्रपानाची तलफ भागविण्यासाठी सिगारेट ओढली अन् याचवेळी त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना झंवर अचूकपणे ‘स्पॉट’ झाला अन् पोलिसांनी त्या घराची घेराबंदी करत झंवरच्या शिताफीने मुसक्या बांधल्या.
सातत्याने वेशांतर करत पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची नजर चुकवीत अन् वारंवार मोबाइल लोकेशन बदलून झंवर हा कधी मुंबई, इंदूर तर कधी उज्जैन आणि राजस्थानमध्ये आश्रय घेत होता. मात्र, पुणे पोलिसांनीही तपासाची चिकाटी दाखवीत तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने झंवर वापरत असलेले मोबाइल इंटरनेट डोंगलचे लोकेशन ‘ट्रेस’ करत त्याच्या मागावर कायम राहिले. झंवरला कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घेत न्यायालयापुढे उभे करायचे, असा चंग बांधलेल्या पुणे पोलिसांनी नाशिकच्या गोदाकाठी पंचवटीत शिताफीने मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले.दहा दिवसांपासून पुणे पोलीस मागावरपुणे पोलिसांचे पथक मागील दहा दिवसांपासून झंवरच्या मागावर होते. इंदूरमध्ये पोलिसांना झंवरचे लोकेशन मिळालेही होते; परंतु तेथे तो निसटून जाण्यास यशस्वी ठरला. तो सातत्याने वेगवेगळे मोबाइल वापरत लोकेशन बदलत होता. पोलिसांनी सुमारे ५० हून अधिक मोबाइलचे ‘सीडीआर’ तपासले. तसेच या दहा दिवसांत २५०० किमीपर्यंतचा प्रवास पथकाने केल्याचे समजते. इंदूरहून सुमारे ४३० किमीचा प्रवास करत झंवरचा पोलिसांनी साध्या मारुती इको कारने पाठलाग सुरू ठेवत नाशिकमधील पंचवटी गाठले.कारवरून झंवरचा सुगावासोमवारी मध्यरात्री झंवर दिंडोरी रोडवरील पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका वसाहतीत शिरला अन् अंधारात गायब झाला. पोलिसांनी त्या वसाहतीत प्रवेश करत गस्त सुरू ठेवली असता एका घराबाहेर त्यांना अनोळखी कार नजरेस पडली. पोलिसांनी या कारवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. कारची माहिती घेतली असता ती त्याचा मुलाच्या नावावर असल्याचे लक्षात आले अन् पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
मध्यरात्री झाला गायब अन् पहाटे आला ‘उजेडात’दबा धरून असलेल्या पोलिसांनी तो झंवर नसल्याची खात्री पटविली आणि ॲलर्ट होत काही अंतर त्यांची कार पुढे घेत वाहनातूनच लक्ष केंद्रित केले असता झंवर हा घराच्या बाल्कनीमध्ये लाल रंगाच्या टी-शर्टवर धूम्रपानासाठी आलेला दिसला पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्धरीत्या सापळा रचला आणि झंवरला शिताफीने ताब्यात घेत वाहनात डांबले. झंवरने ज्या घरात मध्यरात्रीपासून विश्रांती घेतली होती, ते त्याच्या मामाचे असल्याचे बोलले जात आहे.