कल्याण : कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने घटनेनंतर लगेच त्याचे सोशल मीडिया अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलिट केल्या. आपली ओळख पटू नये यासाठी त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली.
गवळीच्या घरात २२ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता पीडित मुलगी आढळून आली. त्याने मुलीला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह एका बॅगेत भरून पत्नी आणि त्याचा रिक्षाचालक मित्र याच्या मदतीने बापगाव येथील निर्जनस्थळी फेकून दिला. त्यानंतर पसार होण्याआधी एका बारमधून दारू विकत घेतली. बायकोला घरी साेडून तो पसार झाला. यादरम्यान त्याने त्याचे फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरील सगळे फोटो, चॅट डिलिट केले.
गवळीचे सोशल मीडिया अकाउंट पोलिसांनी तपासले असता, त्यावर कोणताच तपशील, माहिती, फोटो उपलब्ध नव्हते. त्याच्या व्हॉटसॲपवरील डीपीही त्याने हटविला. दाढी काढून त्याला पसार व्हायचे होते. त्यामुळेच त्याने सोशल मीडियावरील पोस्ट डिलिट केल्या. ज्यामुळे कुणीही आपल्याला ओळखणार नाही. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढत शेगावमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.
महेश गायकवाड समर्थनाची पोस्ट कधी केली?- विशाल गवळी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप शिंदेसेनेचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केला. त्यानंतर भाजपने विशाल गवळीच्या समर्थनार्थ केलेली फेसबुक पोस्ट दाखवून तो महेश यांचाच समर्थक असल्याचे सांगितले. - आराेपीने त्याचे फेसबुक अकाउंट हत्येच्या घटनेनंतर डिलिट केले तर ही पोस्ट भाजपला कुठून मिळाली, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. - याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. भाजपने गवळीची गायकवाड यांच्याशी दोस्ती असल्याची फेसबुक पोस्ट दाखवली असली तरी ती पोस्ट गवळीने कधी केली? याचा पोलिस तपास करीत आहेत.