औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार नोंदविणाऱ्या तरुणीविरुद्ध उपायुक्तांच्या पत्नीनेही ९ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तब्बल महिनाभरानंतर समोर आलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणात काही वेगळेच शिजत असल्याचे घाटत आहे. त्या तरुणीने आमच्या घरी येऊन माझ्या पतीविरुद्ध घाणेरडे आरोप केल्याचे स्वाती श्रीरामे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीत म्हटल्यानुसार, ८ जून रोजी ती आमच्या निवासस्थानी आली. माझे पती राहुल श्रीरामे यांच्यासोबत संबंध असल्याचा आरोप करून तिने आरडाओरड केली. त्यांनी जर माझ्या आईला पैसे दिले नाही, तर त्यांची बदनामी करीन, एवढेच नव्हे तर मी आत्महत्या करून तुम्हाला आणि राहुल यांना जेलमध्ये पाठवेल, अशी धमकी तिने दिली होती. ही तक्रार एमआयडीसी सिडको पोलिसांना ९ जून रोजी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट...पीडितेविरुद्धची उपायुक्तांच्या पत्नीची तक्रार प्राप्त झाली का आणि हा तक्रार अर्ज प्राप्त झाला असेल, तर त्याविषयी एमआयडीसी सिडको पोलिसांनी काय कारवाई केली, या प्रश्नाचे उत्तर देण्यास एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या अधिक ाऱ्यांनी नकार दिला. लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
काय आहे प्रकरण
स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून आणि नंतर लग्नाच्या आमिषाने पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार २२ वर्षीय पीडितेने २१ जून रोजी पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटस् अॅप क्रमांकावर पाठविली होती. पीडितेला बोलावून तिने पाठविलेल्या व्हॉटस् अॅपवरील तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २१ जून रोजी महिला तक्रार निवारण मंचमध्ये उच्चस्तरीय समितीने तक्रारीच्या प्रिंटवर तिची स्वाक्षरी घेतली होती.
या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी सिडको ठाण्यात उपायुक्त श्रीरामेविरुद्ध लैंगिक शोषण, मारहाण आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद केला; परंतु तत्पूर्वीच तब्बल १२ दिवस अगोदर (दि.९ जून) स्मिता श्रीरामे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली का, या प्रश्नावरही पोलिसांनी चुप्पीच साधली.