लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोक्याच्या जीपीओ चौकात चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारला. हुक्का पार्लरचा मालक आशिष सुरेशराव गायकी (रा. अयोध्यानगर) आणि व्यवस्थापक पंकज मधुकर गोलाईत (रा. दिघोरी नाका) या दोघांवर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खळबळ निर्माण झाली आहे.शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून जीपीओ चौकातील द कॉमन ग्राऊंड कॅफे बार, मिसू मिसू एशियन रेस्टॉरंटमध्ये बिनबोभाट हुक्का पार्लर चालविला जात होता. येथे तरुण-तरुणीच नव्हे तर अल्पवयीन मुलामुलींचीही मोठी गर्दी राहायची. मोठी रक्कम घेऊन त्यांना विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थमिश्रित हुक्का उपलब्ध करून दिला जात होता. त्याची माहिती कळताच सोमवारी एसएसबीच्या पथकाने योजनाबद्ध पद्धतीने येथे छापा मारला. यावेळी तेथे हॉटेलमालक गायकी आणि व्यवस्थापक गोलाईत यांच्याकडून नोकराच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या फ्लेवरचा हुक्का उपलब्ध करून दिला जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तेथून हुक्का पॉट तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. गायकी आणि गोलाईतविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सीताबर्डी पोलीस अनभिज्ञ कसे ?विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून हे हुक्का पार्लर बिनबोभाट सुरू होते. सीताबर्डी ठाण्यातील कुणालाच त्याची कशी कुणकुण लागली नाही, असा प्रश्न आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, उपनिरीक्षक अतुल इंगोले, स्मिता सोनवणे, हवालदार मनोज चव्हाण, संजय पांडे, प्रवीण फांदडे, छाया राऊत, दीपिका दोनोडे आणि संदेश पाटील यांनी ही कारवाई केली.
नागपुरात हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:31 AM
मोक्याच्या जीपीओ चौकात चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा मारला.
ठळक मुद्देमिसू मिसू एशियन रेस्टॉरंटचा मालक अन् व्यवस्थापक गोत्यात : सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल