पुणे - अटक केलेल्या नातेवाईकाला जामीन मिळावा यासाठी मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी करुन पोलीस उपनिरीक्षकासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोंढव्यात सापळा रचून एका दुकानदाराला पकडले आहे.
पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे (वय ३२) आणि पोलीस शिपाई गोपाळ हरी दाभाडे (वय २५, रा़ कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्यासाठी लाच घेणारा मसाला व्यापारी राजू उस्मान अत्तार (वय ४८, रा़ कोंढवा) याला अटक केली आहे़ भीमराव मांजरे हे कोंढवा पोलीस ठाण्यात प्रोबेशनरी म्हणून नियुक्त आहेत. तर पोलीस शिपाई गोपाळ दाभाडेही कोंढवा पोलीस ठाण्यात नियुक्तीवर आहेत.
तक्रारदार यांच्या नातेवाईकाला कोंढवा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या नातेवाईकाला जामीन करण्यास मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मांजरे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती़ तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली़ त्यांच्या तक्रारीची पडताळणी भीमराव मांजरे याने १ लाख रुपयांची मागणी केल्याचे व तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले़ पैसे देण्याच्यावेळी मांजरे व दाभाडे यांनी तक्रारदाराबरोबर क्रॉन्फरन्स कॉलवर बोलून ही रक्कम राजू अत्तार या दुकानदाराकडे देण्यास सांगितले़ अत्तार याचे अत्तार मसालेवाले या नावाने दुकान आहे़ पोलिसांनी तेथे सापळा रचला़ तक्रारदारकडून २० हजार रुपये घेताना राजू अत्तार याला पकडण्यात आले़ दरम्यान, मांजरे आणि दाभाडे पळून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.