श्रीगंगानगर – राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरात एका शिपायाने महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यामुळे या महिलेने मृत्यूला जवळ ओढलं आहे. मृत्यूपूर्वी बनवलेल्या या व्हिडीओत महिला आरोपी पोलीस शिपायाचे कारनामे उघड करत नदीत उडी मारून स्वत:चा जीव दिला आहे. या महिलेने व्हिडीओत पोलीस शिपाई मनीराम चौहान यांच्यावर बलात्काराचा आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं महिलेने सांगितले आहे.
मृत महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस विभागात खळबळ माजली आहे. या गोंधळात एसपी राजन दुष्यंत यांनी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल मनीराम चौहानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन त्याला निलंबित केले आहे. तर आरोपी कॉन्स्टेबलची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलीस कॉन्स्टेबल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
केसरी सिंहपूर परिसरातील ही घटना आहे. ज्याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह गावाच्या काही अंतरावर नदीत आढळला आहे. ही मृत महिला तीन मुलांची आई आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पतीची तक्रार आहे की, मटीली पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल मनीराम चौहान यांनी महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. पत्नी आणि मनीराम यांच्यात काही गोष्टीवरून वादविवाद सुरू होते. त्यामुळे महिला त्रस्त झाली होती. अखेर तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली.
या महिलेने मरण्यापूर्वी एक व्हिडीओ जारी केला त्यात म्हटलं आहे की, मी माझं जीवन संपवायला जात आहे, सॉरी मम्मा, पप्पा, भैय्या, भाभी मी तुम्हाला सोडून चालली आहे. मी माझ्या जीवनाला वैतागली आहे कारण माझ्या मरण्यामागे पोलीस शिपाई मनीराम चौहान आणि त्याची पत्नी दोघं जबाबदार आहेत. फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. मनीरामने माझ्यासोबत वारंवार बलात्कार केला तसेच मला ब्लॅकमेलिंगही केले असा आरोप तिने केला आहे.
महिलेचा व्हिडीओ जारी होणे आणि तिने नदीत उडी मारून आत्महत्या करणे या घटनांचा तपास करण्यासाठी डीएसपी सुरेंद्रसिंह राठोड घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. मृतदेह पोस्टमोर्टम करून त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात येईल. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवल्यानंतर त्या महिलेने आरोपी कॉन्स्टेबल मनीरामला हा व्हिडीओ पाठवला आहे. तेव्हापासून तो फरार आहे. मृत महिलेच्या पतीने तक्रार केल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मनीरामचा शोध सुरू आहे.