औरंगाबाद: वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक चालू देण्यासाठी वाळू व्यवसायिकाला १५ हजार रुपये लाचेची मागणी करून १० हजार रुपये लाच घेताना वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. विशेष म्हणजे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्रकुमार सिंगल यांनी नुकतचे पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून वाळूसंबंधीचे न्यायालयीन कामकाज कर्मचाऱ्यांकडून ठाणेदारांनी स्वत:कडे घ्यावे असे आदेश दिले होते.
भोलानाथ रामसिंग राठोड (३७,रा. जमन ज्योती, हर्सूल शिवार)असे अटकेतील पोलीस हेड काँन्स्टेबलचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भोलानाथ हे फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार हे वाळू व्यवसायिक आहेत. वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्यांचा ट्रक औरंगाबादला वाळू घेऊन येतो. ही बाब पोलीस हेड काँन्स्टेबल भोलानाथ राठोड यांना समजल्याने काही दिवसापूर्वी त्यांनी ट्रक अडविला होता. तुझ्या ट्रकविरोधात कारवाई करायची नसेल तर पंधरा हजार रुपये हाप्ता द्यावा लागेल, असे सांगितले होते.
वाळू व्यवसायिक यांना आरोपी हवालदारला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निरीक्षक रविंद्र निकाळजे, कर्मचारी पोहेकाँ जुंबड, सचिन राऊत, खंदारे यांनी दोन पंच तक्रारदार यांच्यासोबत पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा पंचासमक्ष आरोपी पोहेकॉ राठोड ने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. दरम्यान आज गुरूवारी (दि. ३)आॅक्टोबर रोजी लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाार यांना औरंगाबादेतील हर्सूल येथे बोलावले. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हर्सूल येथे लाचेचा सापळा रचला. तेव्हा पोहेकॉ राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेतली. राठोडने लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले.