नालासोपारा/मनोर : वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीची धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महार्गावरील ढेकाळे गावात घडली आहे. मनोर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या स्नेहल पाटील आणि त्याचे पती पुंडलिक आनंदा पाटील (३०) हे पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस कॉलनीतील रूम नंबर ७ मध्ये राहात होते. पुंडलिक पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांना बुधवारी रात्री मनोर येथे रिक्षाने जाण्यासाठी भाडे आल्याने ते प्रवाशाला घेऊन निघाले. रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची रिक्षा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर ढेकाळे गावच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कडेला त्या गावातील शेतकरी प्रदीप तुकाराम बाबर (३२) याला दिसली. त्याने जाऊन पाहिले असता रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस व उजवे कानावर कोणत्या तरी धारदार शस्त्राने वार करून हत्या केलेला मृतदेह रिक्षामध्ये दिसला. त्यांनी लगेच मनोर पोलिसांना घटनास्थळी बोलावले.
पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. ही हत्या कोणी व कोणत्या कारणांमुळे करण्यात आली याचा शोध पोलीस करत असून शेतकऱ्याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याचे मनोरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.