लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : थर्टी फर्स्ट तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा अंमलीपदार्थ विरोधी विभाग (एएनसी) अलर्ट झाला आहे. त्यानुसार, १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांसह तस्करी, पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढविण्यात येणार असल्याचे अंमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले आहे.
माटुंगा रोड स्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावरील खुलेआम सुरू असलेल्या ड्रग्ज विक्रीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माटुंग्याची ड्रग्ज विक्री प्रकाशात आली. शहरात अनेक ठिकाणी खुलेआम ड्रग्ज विक्री सुरू असल्याचे पाहावयास मिळते. भांडुप टेंबीपाडा, मानखुर्द, गोवंडी, शिवडी, काळाचौकी, डोंगरी भागातही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री सुरू असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. मुंबई पोलिस, एएनसी, एनसीबी यांच्याकडून ड्रग्ज विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. मात्र, त्याला पूर्णपणे प्रतिबंध करण्यात यंत्रणांना यश आलेले नाही.
ड्रग्जसाठी नवे कोडवर्ड यात, ‘एक मीटर कपडा दो’ म्हणजे एक किलो एमडी, ‘एक पॉट’ म्हणजे एक किलो गांजा, ‘आईज’ म्हणजे एम्फेटामाइन, चरससाठी क्रीम, हेरॉईनसाठी जादू की पुडिया, ‘स्मँक’ म्हणजे हेरॉईन, ‘एक चिबा’ म्हणजे एक किलो चरस तसेच सध्या गांजासाठी ‘न्याहारी’, असे कोडवर्ड वापरले जात असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले.
कुरिअर कंपन्या रडारवर... कुरिअरद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे.
कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात येते. त्यामुळे विविध कुरिअर कंपन्या रडारवर असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
थर्टी फर्स्ट नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थाच्या विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सॲप आणि इव्हेन्ट ऑर्गनायझर कंपन्यांच्या साईटसह अन्य सोशल नेटवर्किंग साईट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्या ऑनलाईन बुकिंग साईटवर गुन्हे शाखेची नजर आहे.
शहरातील कुलाबा, गिरगाव, मरिन लाईन्स, वरळी, दादर, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी इव्हेंट कंपन्या स्वत:चे वेगळे पेज नेटवर्किंग साईटवर तयार करून अशा पार्ट्यांचे आयोजन करते तर काही इव्हेंट कंपन्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स ॲपचा वापर करून अशा पार्ट्यांचे आयोजन करतात. त्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होते.
शहरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री यांच्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तस्करांवर प्रतिबंधक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.