पिंपरी : पोलीस असल्याचे सांगूनही त्याच्या सहकाऱ्याला दारु न दिल्याने एका पोलीस शिपायाने हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये राडा घातला. हॉटेल मालकाला मारहाण करत शेजारील हॉटेलची मोडतोड करुन नुकसान केले. ही घटना रविवार(दि. ४) रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी, रामकिसन रमेश खैरनार (वय ३२ रा.आदर्शनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पुणे शहरातील पोलीस शिपाई अक्षय धुमाळ याच्यासह त्याचा साथीदार अजय खोत व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवारी रात्री हॉटेल बंद झालेले असताना पोलीस शिपाई अक्षय धुमाळ हा त्याच्या तीन साथीदारांना घेवून रात्री एक वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील हॉटेल एफएमएल येथे आला. त्याने फिर्यादी खैरनार यांना आम्ही पोलीस आहोत, तु आमच्या माणसाला त्यादिवशी दारु का दिली नाही, असे म्हणून खैरनार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. परत जात असताना बाजुच्या चायनिज दुकानाला लाथ मारुन त्याची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अद्याप पोलिसांनी धुमाळ व त्याच्या साथीदाराला अटक केलेली नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दारु न दिल्याने हिंजवडीत पोलीस शिपायाचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:43 PM