औरंगाबाद : कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला पळवून नेण्यासाठी कट रचून, पोलिसांवर पिस्टल रोखून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या अकरा आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी. एस. वमने यांनी १ सप्टेंबर २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुन्हे शखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल राजेंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून सरुफ खान शकूर खान (५०, रा. महाराज खेडी, घलटाका चौकी, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्यप्रदेश), नफीस खान ऊर्फ मेवाती मकसूद खान (४०, रा. गोगावा, शहापूर, बिडी मोहल्ला, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्यप्रदेश), नकीब मोहंमद नियाजू मोहंमद (५५, रा. निमरानी, ता. कसरावत, टाकारवळ चौकी, जि. खरगोन, मध्यप्रदेश), फरीद खान मन्सूर खान (३५, रा. अकबरपूर फाटा, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्यप्रदेश), शब्बीर खान समद खान (३२, रा. रजानगर, ता. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश), फैजुल्ला खान गणी खान (३७, रा. खडकवाणी, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्यप्रदेश), शाकीर खान कुर्बान खान (४०, रा. बलखड, ता. कसरावत, जि. खरगोन, मध्यप्रदेश), शेख यासेर शेख कादर (२३, रा. कौसरपार्क, नारेगाव, औरंगाबाद), सय्यद फैसल सय्यद एजाज (१८, रा. किलेअर्क, काला दरवाजा, औरंगाबाद), मोहम्मद नासेर मोहम्मद फारुख (२६, रा. चंपाचौक, मुजीब कॉलनी, औरंगाबाद), मोहम्मद शोएब मोहम्मद सादेक (२८, रा. नाहेदनगर, बाबर कॉलनी, औरंगाबाद ) या ११ आरोपींना पोलिसांंनी मंगळवारी न्यायालयात हजर केले.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एच. जारवाल आणि सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपी गुन्ह्यासंबंधी उडवाउडवीची उत्तरे देतात. ते मध्यप्रदेशातून औरंगाबादला कधी आले, येथील कोणकोणत्या स्थानिक आरोपींना भेटून गुन्ह्याचा कट रचला, पिस्टल कोठून आणले ही विचारपूस करावयाची आहे. या आरोपींनी इम्रान मेहदीच्या साथीदारांना पिस्टल पुरविले आहे काय, आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचे दस्तऐवज हस्तगत करावयाचे आहेत. आरोपींकडे काडतुसाच्या पुंगळ्या आढळल्या, त्याचा वापर त्यांनी कोणाविरुद्ध व कधी केला, याचा तपास करण्यासाठी आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती त्यांनी केली.
बचाव पक्षाचा युक्तिवादबचाव पक्षातर्फे आरोपी सय्यद फैसलकरिता युक्तिवाद करताना अॅड. अशोक ठाकरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांना आधीपासूनच माहिती होती. त्यांनी आरोपीस अटक करून शस्त्र जप्त केले आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलीस कोठडीची गरज नाही. शिवाय केवळ पिस्टल मिळाले म्हणून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७ आणि १०९ खाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने कोणावरही जीवघेणा हल्ला केला नाही. सबब, प्रस्तुत गुन्ह्यात वरील कलम लागू होत नाहीत. पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद केल्यामुळे तेथे असलेल्या फैसलला संशयावरून अटक केली. पोलिसांनी केवळ कारणे नव्हे, तर स्पष्टीकरण द्यावे, असे उच्च न्यायालयाने अनेक आदेशांमध्ये म्हटले आहे, आदी मुद्दे मांडून फैसलला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. अशाच प्रकारचे मुद्दे अॅड. व्ही.एल. सुरडकर आणि अॅड. पौर्णिमा साखरे (जोशी) यांनीही मांडले.