उमरी (नांदेड ) : मराठा आरक्षण आंदोलनात ९ ऑगस्ट रोजी बस तोडफोड प्रकरणी अटकेतील आठ आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उमरी येथे ९ ऑगस्ट रोजी झालेल्या रास्ता रोको व बाजारपेठ बंद दरम्यान बसस्थानकाची नासधूस झाली होती. याप्रकरणी आज दुपारी आठ आरोपींना अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे यांनी न्यायालयात हजर केले. यावेळी सर्व आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी दिले. पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांनी ही माहिती दिली.
आरोपींमध्ये बालाजी ढगे, गोविंद ढगे, दत्ताहरी बालाजी ढगे, दताहरी अनिरुद्ध ढगे, गणेश जाधव, बालाजी पवार, राजेश मोरे व दासराव शिंदे या आठ जणांचा समावेश आहे. सदर प्रकरणात आरोपींची बाजू ॲड. संदीप बी. कुंभेकर यांनी मांडली तर सरकारतर्फे सरकारी वकील ॲड. अजीम खान यांनी काम पाहिले.
रेल्वे पोलीस घेणार होते ताब्यात आरोपींना जामीन मिळाल्यास लगेच ताब्यात घेण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस अधिकारी निजामाबाद येथून आले होते. परंतु, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले.