सांगली : ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्याने बदली झालेल्या ठिकाणी साहित्य घेऊन जाण्यासाठी शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल सादर करून ‘लोकमत’कडून रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ प्रशासनाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संबंधित कर्मचाऱ्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सुभाष महादेवराव वानखेडे (सध्या रा. पंचमुखी मारूती रोड, सांगली, मूळ गाव - म्हाडा कॉलनी, बिल्डिंग नंबर १३, ब्लॉक नंबर ४५, सुरत रेल्वे गेटजवळ, जळगाव) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वानखेडे हे ‘लोकमत’च्या चिपळूण (जि. रत्नागिरी) शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची चिपळूण येथून सांगली कार्यालयात बदली झाली होती. या बदलीनंतर शिफ्टिंग खर्चाचे खोटे बिल दाखवून कंपनीकडून बिलाची रक्कम उकळण्यात आली होती. प्रशासनाकडे सादर केलेल्या बिलाबाबत शंका आल्याने ‘लोकमत’च्या मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संतोष साखरे यांनी बिल सादर केलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीकडे चौकशी केली. यावेळी त्यांनी बिल आम्ही दिलेले नसून, बिलावर उल्लेख केलेले वाहन आमच्या कंपनीचे नसल्याची माहिती ट्रॅव्हल्स कंपनीने लेखी स्वरूपात दिली.
अखेर वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सुभाष वानखेडे याच्याविरोधात फिर्याद दिली होती. ही घटना सांगलीत घडल्याने सांगली शहर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी वानखेडे यास बुधवारी अटक केली व गुरूवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अनंत होळकर हे करीत आहेत.