औरंगाबाद : विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यात मुंबईच्या ‘सीबीआय’ आणि औरंगाबादच्या ‘एटीएस’ पथकाने बुधवारी (दि.२२) पहाटे अटक केलेले शुभम सूर्यकांत सुरळे (२३), अजिंक्य शशिकांत सुरळे (१८) आणि रोहित राजेश रेगे (२२) यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुराड उपाध्ये यांनी बुधवारी दि.२४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तिघा आरोपींना सिटीचौक पोलिसांनी न्यायालयात हजर केले. सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी रिमांड यादीत म्हटल्यानुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात अटक आरोपी सचिन प्रकाशराव अंदुरे याने दिलेल्या माहितीआधारे मुंबईच्या ‘सीबीआय’ आणि औरंगाबादच्या ‘एटीएस’ पथकाने वरील तिघा आरोपींना अटक केली. रेगे याच्या धावणी मोहल्ला येथील घरातून गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, कुकरी, एअर पिस्टल आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
( औरंगाबादेत दाभोलकर खून प्रकरणात जप्त पिस्टल तपासणीसाठी ‘फॉरेन्सिक लॅब’कडे )
पोलिसांतर्फे सरकारी वकील भाग्यश्री संचेती आणि बालाजी गवळी यांनी न्यायालयास विनंती केली की, आरोपींकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे कोणाच्या सांगण्यावरून, केव्हा व कोठून प्राप्त केली, त्यांनी ती शस्त्रे कोणत्या उद्देशाने ताब्यात ठेवली होती. त्यांच्याकडे आणखी कोणती शस्त्रे आहेत, असल्यास ती कोणाकडे लपवली आहेत. या गुन्ह्यात त्यांचे किती व कोण साथीदार आहेत, जप्त शस्त्रांचा वापर करून त्यांनी यापूर्वी कोणते समाजविघातक कृत्य केले आहे काय, याचा तपास करावयाचा आहे. आरोपी उच्चशिक्षित असून, तपासात ते सहकार्य करीत नाहीत. सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. यावरून न्यायालयाने तिघानाही दि.२४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.