पुणे : पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादातून पेट्रोल पंप मॅनेजरसह कर्मचा-याला मारहाण करून पंप जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीसांनी सहा जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुुवारी पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. विशाल हनुमंत भुंडे (वय २४, बावधन बु), ओंकार महादेव लिंगे (वय २१, रा. दापोडी), सुजित गोरख दगडे (वय २१, रा. बावधन), तेजस पुनमचंद डांगी (वय २१, रा. बावधन), गणेश दत्तात्रय निंबाळकर (वय २०, रा. भुगांव), सागर सदाशिव ओहोळ (वय २४, रा. मोडनिंब, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सनिल शिंदे (वय ५८) यांनी फिर्याद दिली. २९ जानेवारी २०१९ रोजी पाषाण एनडीए रस्त्यावरील शिंदे पेट्रोल पंपावर ही घटना घडली. सागर ओव्हाळ हा पंपावर विरूद्ध दिशेने मोटारसायकल घेऊन आला. मी गाववाला आहे माज्या गाडीमध्ये पहिले पेट्रेल भर असे म्हणून सागर याने कामगार अमन गुंजे याला दमदाटी केली. त्यावेळी पंप मॅनेजर सुनिल बनपट्टे हे त्या ठिकाणी गेले असता सागर आणि त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून धमकी दिली. त्यानंतर रात्री पुन्हा पंपावर येऊन आरडा ओरडा करत सुनिल बनपट्टे यांच्या अंगावर तलवार घेऊन जात त्यांना लाथाबुक्यांनी मारणाह करून पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यार्दीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली.
पंप जाळून टाकण्याच्या धमकीप्रकरणी सहा जणांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 7:55 PM