लातूर : शहरातील लक्ष्मी काॅलनी भागात चाेरट्यांचा पाठलाग करताना अचानक जमिनीवर काेसळल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील एका पाेलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना साेमवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सहायक पाेलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण (५६ रा. लातूर) असे मयत पाेलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पार्थिवावार दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील लक्ष्मी काॅलनी भागात साेमवारी पहाटेच्या सुमारास एका घरात चाेरटे घुसले हाेते. दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. काळी वेळात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन चाेरटे मागच्या बाजूने पळून जाताना दिसून आले. यावेळी त्या चाेरट्यांना पकडण्यासाठी पाेलिसांनी पाठलाग केला. सहायक पाेलीस उपनिरीक्षक अहमदखान पठाण हेही चाेरट्यांच्या मागे धावत असताना अचानक ते जमिनीवर काेसळले. यावेळी त्यांना पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले. त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याची माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. घटनास्थळी, रुग्णालयात पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, स्थागुशाचे पाेलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पाेलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना...
कर्तव्यावर असलेले अहमदखान पठाण यांच्या पार्थिवावर लातुरातील कब्रस्थानमध्ये पाेलीस दालाच्या वतीने पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पाेलीस दलातील कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. अंत्यविधीसाठी पाेलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, समाजबांधवांची माेठ्या संख्यने उपस्थिती हाेती.