मुंबई - मुंबईत अमली पदार्थांविरॊधातील कारवाया दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये परदेशी नागरिक असलेल्या नायझेरियन तस्करांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. भायखळा येथील सिग्नलजवळ असलेल्या खडापारसी परिसरात सतत वावरत असलेल्या तस्करांवर काल अमली पदार्थाविरोधी विभागाचे पोलीस अधिकारी कारवाईसाठी गेले असताना मोठ्या प्रमाणात असलेल्या नायझेरियन तस्करांनी पोलिसांवरच हल्ला करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना दगडाने ठेचून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नायझेरियन तस्करांनी केलेल्या हल्यात तीन पोलिस कर्मचारी व दोन अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी जे.जे. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भायखळाच्या रेल्वे वसाहतीजवळील बरकले कंपाउंडजवळ दररोज मोठ्या प्रमाणात नायझेरियन अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येत असतात. याबाबतच्या तक्रारी अमली पदार्थविरोधी विभागाच्या 'दक्ष नागरिक' या हेल्पलाईनवर येत होत्या. विशेष म्हणजे हे नायझेरियन ज्या रेल्वे पोलिसांच्या हद्दीत वावरत असतात त्या रेल्वे पोलिसांनी स्वत: कारवाई करायचे सोडून एएनसीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली होती. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत वरळीच्या एएनसी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांनी त्यांचे पथक शुक्रवारी राञी ८.३० वाजातच्या सुमारास पाठवले. य़ा पोलिसांच्या पथकात एकूण बाराजण होते. पोलिस राञी ९.३० वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहचले असता भायखळाच्या बरकाले कंपाउंडजवळ एक नायझेरियन महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थ देऊन पैसे घेऊन रेल्वे रुळाच्या दिशेने जात होता.
त्यावेळी साध्या वेशात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण, अमर मराठे, पोलिस काँन्स्टेबल रविंद्र मते, दत्ताराम माळी, राजू तडवी यांनी त्या नायझेरियनला पकडले. पोलिसांनी पकडल्यानंतर धिप्पाड देहाच्या त्या नायझेरियन तरुणाने स्वत: ची सुटका करून घेण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी त्याने आरडाओरडा केल्याने रुळावर बसलेल्या त्याच्या इतर २० साथीदारांनी त्या दिशेने धाव घेतली. साध्या वेशात पोलिस कारवाई करण्यासाठी आल्याचे लक्षात आल्यानंतर नायझेरियन तरुणांनी पोलिसांच्या दिशेने रुळावरील दगड भिरकवण्यास सुरूवात केली. काही पोलिस तस्करांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तर काही तस्कर पोलिसांना घेरून मारू लागले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन चव्हाण आणि अमर मराठे यांना तेथील सात ते आठ तस्करांनी विळखा घालून मारत होते. झटापटीत मराठे हे खाली पडले असताना एका नायझेरियन तस्कराने मोठा दगड मराठे यांच्या डोक्यात टाकला. यावेळी मराठे यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्ञाव होऊ लागला. तो नायझेरियन पुन्हा मराठे यांच्या डोक्यात दगड टाकणार तोच मराठे आणि चव्हाण या अधिकाऱ्यांनी त्या तस्करांना धक्का देऊन त्यांच्या तावडीतून पळ काढला.